Vasturaviraj

A Trusted name in Vastushastra

प्रार्थना, नामस्मरण व्यक्तिला,समाजाला उपयोगी आहे का?

नामस्मरण व प्रार्थना हया दोन्ही गोष्टींचा व्यक्तिगत व समाज जीवनांवर निश्चितच चांगला परिणाम होतो. दोन्ही शक्ति ऐकच आहेत.

नाम ही ऐक परमात्म शक्ति आहे. आपण ज्याचे नांव घेतो तोच खरा असून, त्याच्याच सत्तेवर सगळे घडते ही जाणिव सतत जागृत रहाणे हेच नामस्मरण होय. सर्व दृष्य जगत हे ईश्र्वरीय सत्तेवरच चालते आहे. तोच खरा सूत्रधार असून आपण सर्व त्याच्या हातांतील कळसूत्री बाहुल्या आहोत. म्हणूनच तुकोबा म्हणतात.

चाले हे शरीर कुणाचिये सत्ते ।

कोण बोलविते हरीविण।।1।।

देखवी ऐकवी एक नारायण।

तयाचे भजन चुकवू नये।।2।।

वृक्षाचेहि पान हालें ज्याचिया सते।

राहिली मग अहंता कोठे।।3।।

याकरीतांच व्यक्तिगत स्तरांवर तसेच सामाजिक स्तरावर त्याचे नामस्मरण, प्रार्थना होणे आवश्यक आहे. भगवंताचे प्रति प्रेमभाव म्हणजे प्रार्थना होय. प्रार्थना ईश्र्वर प्राप्तीचे सर्वांत प्रभावी साधन आहे. ईश्र्वराची कृपा झाली तरच सद्‌गुरूंची प्राप्ती होते. तसेच सद्‌गुरूंची प्राप्ती झाली तरच मोक्षाची प्राप्ती होते. सद्‌गुरूंच आपल्या खऱ्या सुखाची सोय लावू शकतात. ते एकच तत्व असे आहे की, “”तेथे माया स्पर्शो शकेना” (समर्थ रामदास स्वामी)

संपूर्ण दृष्य अदृष्य जगत मायेच्या आधीन आहे. इतकेच नव्हे तर ब्रह्म-विष्णू-महेश हे सुद्धा मायोपाधित असून, आत्यंतिक प्रलयाचे वेळी ते सुद्धा परब्रह्म तत्वांतच विलिन होतात परंतु गुरू हे साक्षात “”परब्रह्म असल्यामुळेच या मायेच्या बाजीगरीतून आपली सुटका करू शकतात. या करता सद्‌गुरू शरणागता हा ऐकमेव मार्ग आहे. हया मार्गाची प्राप्ती केवळ प्रार्थनेमुळेच होऊ  शकते. या प्रार्थनेमुळेच भगवद्‌भाव वाढीस लागतो. परिणामतः अंतःकरणांतील वाईट विचार नाहीसे होऊ न सद्‌विचारांची वाढ होईल.

परंतु ही प्रार्थना निष्काम असावी. येथे भगवंताचे ॠणी रहाण्याचा भाव असतो. जे काही प्राप्त झाले आहे ती केवळ भगवंताची कृपाच आहे हा भाव असतो. जे जे काही मिळाले आहे ते अमुल्य आहे. आमचे स्वास्थ्य (आरोग्य), आमची दूरदृष्टी (सर्व त्याचीच कृपा समजावी या विनामूल्य प्राप्त झालेल्या संपदेपुढे) सर्व भौतिक सुखें कस्पटासमान वाटू लागतात. अशा प्रकारच्या निष्काम प्रार्थनेत नितांत श्रद्धेची आवश्यकता असते. कारण गीतेत भगवंत स्वतः सांगतात की “”श्रध्दावान लयते ज्ञानं तत्पर-संयेतन्द्रियः” याकरीता ही श्रद्धा भासकी, कुजकी, तकलादू, अंध अशी नसावी. ही श्रद्धा जेवढी दृढ होत जाईल. तस तशी प्रार्थना फलित होत जाईल व जर तसे झाले नसेल समजा श्रद्धा कमी पडते आहे. ती वाढवायला हवी कारण श्रद्धाच माणसांतील सर्वात महान  अशी ताकद आहे. श्रद्धा व प्रार्थनेचा अन्योन्य संबंध आहे. ज्या प्रार्थनेंत श्रद्धा नाही तो केवळ शब्दांची पोपटपंची आहे असे समजायला हरकत नाही. तेव्हा श्रद्धेने केलेली प्रार्थना जीवनांत फार मोठया घडामोडी घडवून आणते. जेव्हा प्रार्थना हृदयांतून निघते. तेव्हांच ती वास्तविक प्रार्थना होय अशाच प्रार्थनेन मनुष्य महान होतो त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकतो म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात.

उपासनेचा मोठा आश्रयो। उपासनेविण निराश्रयो।

          उदंड केले तरी तो जयो। प्राप्त नाही।।                                              

प्रार्थनेंत चित्ताची एकाग्रता फार महत्वाची असते. तसेच सात्विक बुद्धी व स्थिर शरीराची सुद्धा आवश्यकता असते; त्याशिवाय प्रार्थनेचे चांगले परिणाम साधता येत नाहीत. तेव्हा स्थिर अंतःकरणाची मागणी भगवंताजवळ करावी. प्रार्थनेत धैर्याला सुद्धा तेवढेच महत्व आहे. जेवढे एकाग्रचित्ताला असते. मनाची चंचलता, घाई इ. मुळे प्रार्थनेद्वारा योग्य तो परिणाम साधला जात नाही. धैर्याशिवाय प्रार्थना शेवटाला पोहचू शकत नाही. परंतु थोडा धीर धरला तर प्रार्थना निश्चितच फलदायी ठरते. फलदायी ठरते याचा अर्थ केवळ “”आपल्या मनासारखे घडणे” एवढी संकुचित भावना येथे अपेक्षित नसून जे आपल्या करीता योग्य असेल तेच ईश्र्वर देईल ही भावना असल्यास, घडणारी घटना आज जरी दुःखद वाटत असली तरी भविष्यात तेच सुखद ठरू शकते या करीता समाधान आवश्यक ठरते.

ठेविले अनंत तैसेचि रहावे।

चित्ती असो द्यावे समाधान।

संत तुकाराम महाराज

खऱ्या अर्थाने प्रार्थना म्हणजे ईश्र्वराशी योत्र जोडणे होय. आपल्याला प्रार्थनेची का आवश्यकता आहे? आम्ही पवित्र आहोत म्हणून आम्हाला प्रार्थनेचि आवश्यकता आहे. पतित याचा अर्थ केवळ पापी एवढाच नसून, जो स्वरूपा पासून ढळला तो पतित होय. ज्याने आम्हाला निर्माण केले. त्याची ओळख करून घेणे मनुष्य जन्मांत अपरिहार्य ठरते. जो भगवंताची ओळख करून घेत नाही तोच पतित होय. म्हणूनच समर्थ म्हणतात.

जेणें संसारी घातलें। अवघे ब्रम्हांड  निर्माण केले।

त्यासी नाही ओळखिले। तोचि पतित।।

प्रार्थना ईश्वर कृपा प्राप्तीचे सर्वात महत्वाचे साधन आहे. त्याच्याच प्रार्थनेमुळे शरणागतता या गुणाची प्राप्ती होऊ  शकते . अशी शरणागतताच मायेतून तरून जाण्यास उपयोगी पडते. कारण तोच के वळ मायाजित असून त्याचीच ही लिला आहे, माया आहे. या मायाजाळांतून बाहेर पडायचे असेल तर त्याच्याच कृपेची आवश्यकता आहे. अन्यथा या मायेलाच सत्य समजून अज्ञान अंधःकारमय असे जीवन आपण जगत बसू. ही मायाच सुख दुःखाचा खेळ मांडते व आपण त्यातच रममाण होतो. बरे सुख, दुःख तरी समान आहेत का? नाही. कारण तुकोबाच सांगतात, सुख पाहता जवा पाडे। दुःख पर्वता एवढे म्हणूनच प्रार्थना करून भगवंता जवळ ज्ञानमय जीवनाची याचना करायची आहे असे जीवन प्राप्त झाले की या मायेच्या नाटकाकडे एक नाटक समजून त्या नाटकाचा आनंद लुटता येईल. सुख दुःखाचा विचार करू नका. कारण या सुखदुःखाच्या पलीकडे एक आनंदमय असे जीवन आहे. म्हणून सुख दुःखाची पर्वा न करतां,

“”आयुष्यांतील सुख दुःखाची । मजशी का बांधा।

जीवन नामक यज्ञांतील। या दोन्ही समिधा।।

अशी भावना निर्माण करा. गीता सुद्धा तेच सांगत आहे.

सुख दुःखे समे कृत्वा। लाभा लायौ जयाजयौ।

प्रार्थनेमुळे मन प्रसन्न होते. प्रसन्न मनच ईश्र्वर प्राप्ती करून देऊ  शकते. म्हणूनच तुकोबा म्हणतात, “”मन करारे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।। भागवतात सुद्धा भगवंत हेच सांगत आहेत की बंधनाला व मोक्षाला मनच जबाबदार आहे.

“”मन एवं मनुष्यांणा कारणं बंधमोक्षयोः।”

या करीता मन प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शरीरावर मनाचा फार मोठा प्रभाव पडत असतो. मन प्रसन्न नसेल तर शरीराला अनेक आजार जडू शकतात. तर शरीराला व्याधी निर्माण झाली तर त्याचे परिणाम मनावर होतात. मन उदास होते, मनुष्य मनाने चिडचिडा होतो. जशा शरीराला अनेक व्याधी होतात. तसेच मनांत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर व लोभ हे षडरिपू तसेच चिंता, भय, तणाव हया मानसिक व्याधी जडतात. परिणामतः खालेल्या अन्नाचे रक्त  न बनता पित्तदोष निर्माण होऊ न शरीर अनेक व्याधींचे माहेर घर बनते या करीता मन प्रसन्न असणे गरजेचे ठरते.

शरीराचे डॉक्टर्स खूप आहेत. पण मनाचे? आता आज काल मनोवैज्ञानिक असतात. पण त्यांचा आवाका फारच छोटा आहे. असंतुलित झालेल्या मनाला संतुलीत करू शकतील. पण मनाचे नमन होण्याचे कार्य केवळ प्रार्थनाचा करू शकते. मनाचे कार्य म्हणजे संकल्प विकल्प करणे हे होय. तेव्हा प्रथमतः विकल्प करणे सुटले पाहिजे व पुढे तर संकल्प सुद्धा नकोत. पण हे कसे साध्य होणार? तर केवळ प्रार्थना व नामःस्मरणामुळेच हे सहज शक्य होते.

परंतु येथे एक पथ्य सांभाळायला हवे आणि ते म्हणजे या प्रार्थनेचा आम्हाला अहंकार होता कामा नये. हा अहंकार सुद्धा प्रार्थनेनेच घालविता येतो. जे काही घडते आहे ते सर्व ईश्वरी शक्तीमुळेच घडत आहे, अशी पक्की खूणगाठ बांधावी. कर्माचे कर्तेपण अभिमानामुळे आपले कडे घेऊ  नये. अहंता म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव “”मी मी म्हणतो तोच अहंकार” हा अहंकारच आमच्या प्रार्थनेत बाधा निर्माण करतो. म्हणून किमान प्रार्थना करणाऱ्यांनी तरी हा अहंकार बाळगू नये. अहंकार म्हणजेच गर्व. या गर्वाचे घर नेहमीच खाली असते. हेच सांगण्याकरीता ज्ञानदेव म्हणतात.

  नवल अहंकाराचे गोठी।

विशेष न लगे अज्ञानाचे पाठी।

सज्ञानाचे झोंबे कंठी।

नाना संकटी नाचवी।।

म्हणूनच आपल्या खऱ्या असलेल्या ज्ञानाचा अहंकार असो किंवा भासत असलेला अहंकार असो दोन्ही घातकच ठरतात. भासत असलेल्या ज्ञानाचा अहंकार खऱ्या कसोटीच्या वेळी अडचणीत आणतो तर खऱ्या किंवा असलेल्या ज्ञानाचा अहंकार निष्काळजीपणा निर्माण करतो. या अहंकारामुळे प्रथम सारासार विवेक नष्ट होतो. आणि अशावेळी घेतलेला निर्णय अपयशी ठरतो. ज्याप्रमाणे नाथांच्या चिरंजीवाचा म्हणजे हरिपंडितांचा घर सोडण्याचा निर्णय हा हयाचेच उदाहरण होय.

म्हणूनच भक्ताने सर्वस्वाचा भार हा परमेश्र्वरांवर टाकावा व अयाचित वृतीने जीवन जगावे चित्तात समाधान ठेवून जे सहजा सहजी प्राप्त होईल त्यंात आनंदी असावे. देह देवाचे स्वाधीन करून योग्य काळी त्याची योग्य कर्माकडे योजना करावी. विश्र्वांत या सर्व विश्र्वाचे पोषण करणारे केवळ परमेश्र्वरच आहेत असा निश्र्चय झाला व त्याला संपूर्ण शरणागत झालो की तोच आपली सर्व व्यवस्था लावतो तसा तो गीतेत वचनबद्ध आहे.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनापर्युपासते।

तेषां नित्यभियुक्तांनां योगक्षेम वहाम्यहम्‌

 याचाच अर्थ असा की माझी सदैव प्रार्थना करणाऱ्या माझ्या भक्ताला अपूर्व गोष्टीचा (वस्तूंचा) लाभ मिळवून देणे आणि मिळालेल्या लाभाचे सरंक्षण करणे म्हणजेच परिपालन हेच योगक्षेम होय व दो दोन्ही कार्ये मीच करतो असे श्रेष्ठ आश्वासन भगवंत अनन्य भक्तांना देत आहेत.

या शिवाय जेथे अशी निष्काम प्रार्थना व नामस्मरण चालते तेथेच भगवंत  वास करून रहातात.

ताहं वसामि वैकुंठे योगिनो हृदये रवौ।

मद्‌यक्त  यत्र गायन्ति तत्र तिष्ठायी नारदा।।

अशाप्रकारे हे नमःस्मरण व प्रार्थना व्यक्तिगत जीवनांत तर उपयोगी आहेच पण सामाजिक जीवनांत सुद्धा प्रभावशाली आहेत.

जगांतील सर्व लोक एकत्र येऊ न एकांच ठिकाणी  व ऐकांच वेळी दोन मिनिटे प्रार्थना करतील तर महायुद्ध सुद्धा थांबविता येईल. ही दोन मिनिटाची प्रार्थना फार मोठे कार्य करून जाते. अशा सामुदायिक प्रार्थनेंत खूप शक्ति असते. अशा प्रयत्नामुळे जगांतील हिंसा, गरीबी, दुष्काळ अशा समस्यांचे निवारण होईल. वरील भगवंताचे भागवतांतील वचन याच विधानाची पुष्टी करणारे आहे. अशी सामुदायिक प्रार्थना वातावरणावर सुद्धा चांगला प्रभाव पाडू शकते आज जिकडे तिकडे भेदभाव, दुर्वासना तसेच नास्तिकतेच भाव दिसून येतो, तो या सार्वजनिक  प्रार्थनेमुळे नष्ट होऊ न, त्या ठिकाणी सद्‌भाव, बंधुत्व, समता आदी सद्‌गुण निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे प्रार्थना ऐक सर्वश्रेष्ठ शक्ति असून तिचा वापर कसा करायचा हया गोष्टी हे आपणच विवेकाने ठरवायचे आहे

।। हरि ॐ।।

जय जय रघुवीर समर्थ

 क.वि. नाशिककर

Advertisements

Single Post Navigation

One thought on “प्रार्थना, नामस्मरण व्यक्तिला,समाजाला उपयोगी आहे का?

  1. raghunath on said:

    I like your post.sir,you gave good referance from geeta and sant vadmaya

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: